इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार हे सर्व एकाच विचारसरणीचे असतील, तर विकासाचे वर्तुळ पूर्ण होते. शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधायचा असेल, तर राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
ते दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघ तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या दत्तवाड व टाकळी पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यात मागील काळात सुमारे दोन हजार ५०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात आली असून त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व ग्रामविकासाच्या दृष्टीने भरीव काम झाले आहे. ही विकासाची गंगा पुढील काळातही अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये आपले कार्यकर्ते आणि विकासाला कटिबद्ध प्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक आहे.
दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, रोजगाराच्या विविध योजना, महिलांसाठी व युवकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागाचा विकास हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद उमेदवार उत्तरादेवी विजितसिंग शिंदे, दत्तवाड पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे व टाकळी पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील हे उपस्थित होते. उमेदवारांनीही आपल्या मनोगतातून मतदारांशी संवाद साधत विकासाची दिशा मांडली.
यावेळी दत्तवाडचे माजी उपसरपंच संजय पाटील, बाबासाहेब वनकोरे, विजितसिंग शिंदे सरकार, अशोक कमते, विनोद पाटील (सैनिक, टाकळी) यांनीही मनोगत व्यक्त करत राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास आलगौडा पाटील दानवाड, धन्यकुमार सिद्नाळे, नूर काले, सरपंच अनिता कडाके, माजी सरपंच चंद्रकांत कांबळे, बापू कोळी यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
