जयसिंगपूर येथे सेवा सोसायटी पदाधिकारी व सचिवांची आढावा बैठक संपन्न
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : -
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. तरी देखील जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्या - ज्या नवीन योजना देता येतील तेवढ्या देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधली जाईल. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पीक कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करून सभासद व शेतकऱ्यांच्या साठी दिलासादायक निर्णय घेतला जाईल. सभासदांच्या कर्जावरील व्याजदर सध्या एक टक्के कमी करण्यात आला आहे, यामध्ये आणखी व्याजदर कमी करण्यासाठी पाठपुरावा करून शेतकरी व सेवा संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
जयसिंगपूर येथील ईदगाह मैदानावरील सांस्कृतिक हॉलमध्ये शिरोळ तालुक्यातील विविध कार्यकारी (सोसायटी) सेवा संस्थाचे पदाधिकारी,सचिव व सेवा सोसायट्या समोरील अडी - अडचणी जाणून घेण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन शिरोळ तालुक्याचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून केले होते, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते. या आढावा बैठकीचे स्वागत शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले,
शिरोळ तालुक्यात प्रत्येक वर्षी अशा आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा बँकेचे संचालक या नात्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सातत्याने करत असतात, आजच्या या बैठकीत सेवा सोसायटी पदाधिकारी यांनी कामासंदर्भात येणाऱ्या समस्या आणि अडचणी बैठकीत मांडल्या,
यावेळी पदाधिकारी व सचिवांच्या सर्व प्रश्नांना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच येणाऱ्या जनरल सभेत सर्वच प्रश्ने मांडून त्याचा निपटारा केला जाईल, अशी ग्वाही आमदार यड्रावकर यांनी यावेळी दिली.
प्रारंभी अकीवाट दुर्घटनेतील सुहास पाटील, अण्णासो हसुरे यांच्यासह केडरचे सेक्रेटरी संजय लोटे व वर्षभरात दिवंगत झालेल्या सर्वच मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवर यांच्या हस्ते जिल्हा बँकेकडील निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, यावेळी मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचे निरसन करण्याचा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण करू. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यरत आहे. यापुढेही त्याच माध्यमातून विविध व्यवसायासाठी, शेती कामासाठी, वाहन खरेदीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज उपलब्ध करून देत आहे. याचा लाभ सर्वच शेतकऱ्यांनी घ्यावा. पिक कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी जिल्हास्तरावरील नियमाच्या बाहेर येऊन तालुकास्तरावर पीक कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने निर्णयानंतर लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी सहायक निबंधक अनिल नादरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आडनाईक, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंह रजपूत, रमेश भुजूगडे, जयपाल कुंभोजे, महादेव धनवडे, रामचंद्र मोहिते, प्रभाकर मोरे, सुरेश शहापुरे, भालचंद्र कागले, नंदकुमार पाटील, जगन्नाथ जाधव, केशव राऊत, मुसा इनामदार, राजाराम रावण, अनिल पाटील, प्रदिप चौगुले यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी (सोसायटी) संस्थांचे पदाधिकारी, सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार बबन यादव यांनी मानले.
