जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुदत्त शुगर्सने उच्चांकी ऊस दराबरोबर शेतकर्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उद्देशाने 'गुरुदत्त किसान कार्ड' योजना सुरु केली आहे. याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देताना समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर 'गुरुदत्त किसान कार्ड' या योजनेतून विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी २० शेतकऱ्यांना तीन लाख ६७ हजार रुपयांचे धनादेश श्री घाटगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्सने अनेक ऊस विकास व शेतकरीभिमुख योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. योजनेचा हजारो शेतकर्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवले आहे. उच्चांकी ऊस दरासोबतच कारखान्याने शेतकर्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उद्देशाने 'गुरुदत्त किसान कार्ड' योजना सुरु केली आहे.
योजनेतून शेतकर्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी ३० हजार रुपयांचा वैद्यकिय विम्याचे कवच दिले आहे. तर कोणत्याही अपघाताने योजनेतील शेतकर्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे.
'गुरुदत्त किसान कार्ड ' योजनेतून २० शेतकर्यांना डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बाळंतपण, हर्निया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया आदी शस्रक्रिया व विविध उपचारांसाठी ३ लाख ६७ हजार रुपयांची मदत वैद्यकिय विम्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हॉस्पिटल खर्चाच्या कामी कारखान्याकडून आर्थिक मदत मिळाल्याबदल शेतकर्यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे व कारखान्याचे आभार मानले.
यावेळी संचालक शिवाजी माने-देशमुख, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, धोंडीराम नागणे, आण्णासाहेब पवार, शिवाजी सांगले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
.jpg)