प्रशासनाने पंचनामाला गती द्यावी ; प्रशासनाला सूचना
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून शिरोळ तालुक्यात पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील एकही पूरग्रस्त लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. प्रशासनाने देखील गतीने पंचनामे करून सदरचा अहवाल तातडीने सादर करावा, जेणेकरून लाभार्थ्यांना मदतीची रक्कम तातडीने प्राप्त होईल, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुक्याला पुराचा फटका बसल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते, तरीही अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने पुरबधित प्रत्येक गावातील पंचनामे तातडीने करावेत, जेणेकरून लाभार्थ्यांना शासकीय मदत लवकर प्राप्त होईल.
राज्य सरकारने अतिवृष्टी, पुरग्रस्त नागरिकांसाठी शासकीय मदत देण्यासाठी शासन निर्णय केला आहे. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात पंचनामे पूर्ण करणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर तातडीने पंचनामे करून एकही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, त्याची काळजी घेण्यात यावी. अशा सूचनाही आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
दरम्यान, सध्या प्रत्येक गावातील पूर ओसरला असून गावातील स्वच्छतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्राधान्य देऊन अनेक सामाजिक संस्थांनी ही यामध्ये अग्रभागी व्हावे.
अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण, डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर धूर फवारणी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने औषधसाठा सज्ज ठेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
.jpg)