Top News

शिरोळ तालुक्यात पूर आल्यास जिल्हाधिकारी जबाबदार : धनाजी चुडमुंगे

शासनाच्या निषेधार्थ १ ऑगस्टला नृसिंहवाडीत जलबुडी आंदोलनाचा इशारा                    

                           


      

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

      कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि त्या शेजारचा हिप्परगी बंधारा यामध्ये नियमबाह्य पद्धतीने पाण्याचा साठा केला जात आहे. त्या पाणी साठ्यावर तातडीने नियंत्रण आणा अन्यथा जलबुडी आंदोलन केले जाईल,तसेच शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्यावतीने सोमवारी शासनाला पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश व कृष्णा महापूर समितीची शिरोळ येथे पत्रकार परिषदत झाली यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे हे बोलत होते.

अलमट्टी धरण आणि त्या शेजारचा हिप्परगी बंधारा यामध्ये कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून भरमसाठ पाणीसाठा करीत आहे. पावसाळ्याची आत्ताच सुरुवात असताना धरणात पाणी साठवून ठेवायचा सपाटा कर्नाटक सरकारने सुरू ठेवला आहे.त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होत आहेत. 

 संभाव्य महापुराच्या धोक्याबद्दल कर्नाटक सरकारबरोबर काही संपर्क साधला आहे असे दिसून येत नाही. तसेच महापुराचा इशारा देणाऱ्या, तो येऊ नये म्हणून खटपट करणाऱ्या आणि महापुराच्या वेळी मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था संघटना यांच्याशीही काही संपर्क साधला आहे, असे दिसून येत नाही. यावरून प्रशासनाला महापूर येण्यातच रस आहे, अशी दाट शंका येत आहे.

सध्या पावसाचा जोर वाढतो आहे नजीकच्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यापुढे असाच पाऊस पडत राहिला तर पाणी वाढणार आहे. अशावेळी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणीसाठा नियंत्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी आत्तापासूनच या दोन्ही ठिकाणी विसर्ग वाढवण्याचा आग्रह धरला पाहिजे, परंतु उलट प्रकार घडत असून अलमट्टी आणि हिप्परगी येथे नियमबाह्यरित्या पाणीसाठा वाढवला जात आहे.

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणीपातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही याकडे बारकाईने देखरेख करा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना दिले होते.परंतु दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन तसेच कार्यकारी अभियंते यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे असे स्पष्ट दिसत आहे.

अलमट्टी धरणातील पाणी पातळी 31 जुलै अखेर 513.60.मीटर आणि 31 ऑगस्ट पर्यंत 517 मीटर असली पाहिजे असा केंद्रीय जल आयोगाचा निर्देश आहे. प्रत्यक्षात अलमट्टी धरणाची पाणीपातळी आत्ताच 517 मीटरपेक्षा अधिक आहे. धरणात आवक होणाऱ्या पाण्याच्या तुलनेत विसर्ग (जावक)अत्यंत कमी आहे. अलमट्टी धरणामधील पाणीसाठा आता 95 टीएमसीच्या पुढे गेला आहे. म्हणजेच ते धरण जवळजवळ 95 टक्के आत्ताच भरले आहे. हिप्परगी बंधार्‍याचीही तशीच परिस्थिती आहे. 

गेल्या शेकडो वर्षांचा हवामानाचा व पर्जन्याचा अनुभव लक्षात घेतला तर पावसाळ्यातील नऊ नक्षत्रे ही पावसाची म्हणून ओळखली जातात. यावर्षीच्या पावसाळ्यातील पहिली तीन नक्षत्रेहीअजून संपलेली नाहीत. याचा अर्थ पावसाळा सुरू होऊन अजून जेमतेम दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत. जोरदार पावसाची सहा नक्षत्रे (तीन महिन्यांचा कालावधी) अजून शिल्लक आहेत. तरीही कर्नाटक सरकार व तेथील जलसंपदा विभाग घाई करून धरणात पाणीसाठा वाढवत आहे. ती अत्यंत धोकादायक कृती आहे. पाऊस वाढल्यावर कृष्णा खोऱ्यातील धरणातून विसर्ग वाढणार आहे. त्याच वेळी मुक्त पाणलोट क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी कर्नाटकाकडे कृष्णा नदीतून वाहत जाणार आहे. आजच्या 22 जुलै तारखेला अलमट्टीमध्ये सध्या95 टीएमसी पाणीसाठाअसून त्यानी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक इतकाच पाण्याचा विसर्ग ठेवला आहे.तो विसर्ग 3 लाखाच्या पुढे पाहिजे,नंतर विसर्ग वाढवायला कोणतीही संधी शिल्लक राहणार नाही. साहजिकच कृष्णा खोऱ्यात महापुराचे संकट शंभर टक्के ठरल्यासारखे येणार आहे.

 प्रशासन महापूर रोखण्यासाठी कोणतेही उपाय करताना दिसत नसल्यामुळे आंदोलन अंकुश कृष्णा महापूर समितीचे कार्यकर्ते,नागरिक आणि शेतकरी नाईलाजाने 1 ऑगस्टला नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम घाटावर जलबुडी आंदोलन निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले असल्याचेही शेवटी धनाजी चुडमुंगे यांनी बोलताना सांगितले. यावेळी एकनाथ माने, सुधाकर उदगांवे, संभाजी माने, संभाजी निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने