हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने अब्दुललाट मार्ग लगत असलेल्या हेरवाड येथील सुतार वस्तीतील काही कुटुंबे जनावरांसह स्थलांतराच्या तयारीत आहेत.
रात्रीच्या वेळी हेरवाड - अब्दुललाट हा मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, हा मार्ग पाण्याखाली गेल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर सुतार वस्तीत पुराचे पाणी जाण्याची शक्यता असते. सध्या धरण क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. सध्या पंचगंगा नदी ३७ फुटाच्या वरुन वाहू लागल्याने धाकधूक वाढली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले असून राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे. काल दिवसभारत ७३ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणात ८० टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले तर पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हेरवाड येथील अब्दुल्लाट मार्गालगत असलेल्या सुतार वस्तीतील काही कुटुंब आपल्या जनावरांसमवेत स्थलांतरीच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान प्रशासनाने स्थलांतरित कुटुंबीयांची व त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
