शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील एसटी स्टँड मागे असणाऱ्या कोळी गल्लीतील आरिफ झाकीरहुसेन देसाई ( वय वर्षे : २१ ) या युवकांने आपल्या घरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली. याबाबतची वर्दी संतोष विजय पुंदे ( वय २८, रा. एसटी स्टँड मागे कोळी गल्ली, शिरोळ) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ येथील एसटी स्टँडच्या मागे असणाऱ्या कोळी गल्लीत आरिफ देसाई हे राहत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात जाऊन तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार नाईक करीत आहेत.
