हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यातील प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले आहेत. आज सायंकाळच्या सुमारास शिरोळ - धरणगुत्ती - नांदणी या प्रमुख मार्गावर पुराचे पाणी आल्याने नांदणी आणि शिरोळ शहराचा संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कुरुंदवाड - शिरढोण हा पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या पातळीत वाढत होत असल्याने नांदणी - शिरढोण हा मार्गही पाण्याखाली गेला आहे. याच बरोबर आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास हेरवाड - अब्दुललाट व नांदणी - शिरोळ हे दोन प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजना केल्या असून, नदी काठावरील गावे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
