अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरमधील गडहिंग्लजमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचे हात पाय बांधून त्याच्यावर विष प्रयोग कऱण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे जवानाच्या पत्नीने आणि तिच्या साथीदारानेच हा प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे. अमर देसाई असे या जवानाचे नाव असून गडहिंग्लज पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात. अमर देसाई लष्करात सेवेसाठी गेल्यानंतर त्यांची पत्नी एकटीच घरी असते. काही दिवसापूर्वी अमर सुट्टीवर आले होते. पण पत्नीच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. गुरूवारी (18 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास घरातच त्यांच्या पत्नीने काही बहाण्याने अमर यांचे हात-पाय, डोळे बांधले. त्यावेळी तिचा साथीदारही घरात होता. अमर यांच्या पत्नीने त्यांना नाकावाटे व तोंडावाटे कोणते तरी विषारी द्रव्य पाजून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने अमर यांच्या वेळीच लक्षात आले आणि त्यांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि दरवाजा तोडून नागरिकांनी आत घरात शिरले.
त्याचवेळी पत्नीच्या साथीदाराने खाडे नावाच्या शेजारी व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. त्यानंतर शेजाऱ्यांनी अमर देसाई आणि जखमी खाडे यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर अमर यांच्या तक्रारीवरून पोलिसांत पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
