Top News

शिरोळ तालुक्यातील मेंढ्या चोरीचा तात्काळ छडा लावा : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पोलिस प्रशासनाला सूचना



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यात अलीकडे मेंढ्या चोरीच्या प्रकरणात वाढ होत आहे. अर्जुनवाड, हेरवाड व शिरोळ शहरातील मेंढपाळांच्या मेंढ्या नुकत्याच चोरीला गेलेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन संबंधित प्रकरणाचा तातडीने छडा लावा तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. 

शिरोळ तालुक्यात मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेळीपालन आहे. मात्र अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. शिरोळ तालुक्यातील गोर - गरीब मेंढपाळ आपल्या पोटाला चिमटा काढून मेंढपाळाचा व्यवसाय करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपली संस्कृती टिकवून ठेवून या व्यवसायातूनच त्यांनी आपली प्रगती केली आहे. मात्र, अलीकडे मेंढ्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील सागर पुजारी यांच्या ५, अर्जुनवाड येथील शिवाजी उगारे या मेंढपाळाच्या १२ तर शिरोळ शहरातून २० ते २५ मेंढ्या चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होत आहे. याची दखल घेऊन शिरोळ तालुक्यातील मेंढपाळ यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ संबंधित चोरीच्या घटनेचा शोध घ्यावा, तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने