शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरटी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सौ शुभांगी राजकुमार शिरगांवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सौ हसीना मुल्लाणी यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त सरपंच पदाच्या निवडीकरिता शिरोळचे मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी 2 वाजता शिरटी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा पार पडली दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सरपंच पदासाठी स्वाभिमानीच्या सौ शुभांगी राजकुमार शिरगांवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी घोषित केले यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शिरगांवे समर्थकांनी ग्रामपंचायतीसमोर फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तर आजी-माजी पदाधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीनंतर बोलताना माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवून ग्रामपंचायत व सत्ता आणली सत्तेत सहभागी असणारे सात सदस्य एकमताने निर्णय घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहेत यामुळे गावात अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत सर्व सदस्यांना सरपंच व उपसरपंच पदाची संधी देण्याचे धोरण नेतेमंडळींचे आहे यामुळे सौ अनिता चौगुले सौ हसीना मुल्लाणी व सौ शुभांगी शिरगांवे यांना सरपंच पदाची संधी मिळाली आहे यानंतर सौ भारती सुनील माळी यांनाही सरपंच पदाची संधी दिली जाणार आहे सर्वजण एकत्रित काम करत गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.
नूतन सरपंच सौ शुभांगी शिरगांवे म्हणाल्या की सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन शिरटी गावंच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि शासनाच्या विविध योजनेचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी चनगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले उपसरपंच प्रकाश माळी माजी सरपंच सौ अनिता चौगुले सौ हसीना मुल्लाणी माजी उपसरपंच सागर पवार ग्रामपंचायत सदस्य सौ भारती माळी रामदास भंडारे सतीश चौगुले सुनील माळी प्रकाश उदगांवे भाऊसो पाटील धनपाल मगदूम शिरटीचे तलाठी प्रतापसिंह धोंड ग्रामविकास अधिकारी आयुब मुल्ला ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, आलम मुल्लाणी यांनी आभार मानले.
