नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच निवडीसाठी झालेल्या बैठकीत चित्रा रमेश सुतार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अमित पडळकर हे होते. यावेळी दत्तगुरु ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत जल्लोष करत संपूर्ण गावात विजयी मिरवणूक काढली.
मिरवणुकीनंतर सरपंच चित्रा सुतार व समर्थकांनी श्री दत्त मंदिरात दत्तदर्शन घेतले. निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात माजी जि. प. सदस्या धनश्री जगदाळे, माजी पं. स. सभापती अर्चना धनवडे यांनी चित्रा सुतार यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना सौ. सुतार म्हणाल्या, "गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्यरत असणार आहे. गेल्या तीन वर्षात रेंगाळलेले प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवणार आहोत. सर्वांच्या सहकार्यातून गावाचे हित सध्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे." दत्तगुरु आघाडीचे प्रमुख धनाजीराव जगदाळे म्हणाले, "गेल्या तीन वर्षात खोट्या कागदपत्रांच्या आधारे काही लोकांनी सत्तेचा उपभोग घेतला. मात्र अखेर सत्याचा विजय झाला आहे." माजी उपसरपंच अनंत धनवडे म्हणाले, "येणाऱ्या काळात विकासासाठी आवश्यक असणारा योग्य दृष्टिकोन हा दत्तगुरु आघाडीकडे आहे. विकासात्मक राजकारणाचा एक नवा संदेश आम्ही दिला आहे." मराठा नेते सागर धनवडे म्हणाले, "मागील काळात काही सदस्यांनी ग्रामपंचायतीचे नुकसान केले. मात्र पुन्हा जगदाळे धनवडे गटाची सत्ता प्रस्थापित झाल्याने त्यांना शह बसला आहे." यावेळी ग्रामसेवक बी. एन. टोणे, उपसरपंच रमेश मोरे, सदस्य चेतन गवळी, अनघा पुजारी, विद्या कांबळे यांच्यासह जगदाळे-धनवडे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
