शिरोळ तालुका प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांची जयसिंगपूर येथे बैकठ संपन्न
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. प्रशासनाचे वतीने विशेषता अंगणवाडी सेविकांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता युद्ध पातळीवर काम करावे, जेणेकरून आपल्याच भगिनीला याचा लाभ देता येईल. कागदपत्रांमध्ये शासनाने शिथिलता आणून ही योजना सुटसुटीत करण्यात आली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आपला तालुका अग्रभागी असला पाहिजे, त्या दृष्टीने प्रशासनाने कामाला लागावे, तसेच ही योजना राबविताना केंद्र चालकांनी ज्यादा पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशा सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केल्या.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह तालुका प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांची आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील नाट्यगृहात बैठक आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून विविध लाभदायी योजना आणलेल्या आहेत. यामध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत, पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत, वारकऱ्यांसाठी महामंडळ आणि प्रतिदिंडीला २० हजार रुपयांची घोषणा या सर्वच योजना प्रशासनाने समाजाच्या शेवट घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, प्रामुख्याने महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटीत शिथिलता आणून कागदपत्रांची पूर्तता करताना सुटसुटीतपणा आणला असल्यामुळे याचा लाभ सर्वांना मिळणार आहे. येणाऱ्या ३० तारखेपर्यंत सर्वांनी अगदी शेवटच्या घटकापर्यंत जावून काम करून ही मोहीम पूर्ण करावी जेणेकरून कोणतीही महिला यापासून वंचित राहणार नाही. यासाठी कोणतीही अडचण आल्यास प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याचबरोबर प्रशासनाने देखील तक्रारीसाठी एक डायल नंबर तयार करून महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, बालविकास प्रकल्प अधिकारी मनीषा पालेकर, संजय नांदणे यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
