जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
नागपूर ते गोवा या मार्गावर होणारे शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून तातडीने सदरचे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नागपूर ते गोवा जाणारा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग निर्माण करण्याचा घाट घातला आहे. हा मार्ग ८०५ कि.मी. लांबीचा असून त्याची रुंदी १०० मीटर इतकी आहे. तो ४ शक्तिपीठांना जोडणारा असून महाराष्ट्रतील अकरा जिल्ह्यातून जाणार आहे. हा महामार्ग बांधण्यासाठी ११ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार असलने हजारो शेतकरी भूमिहीन अल्पभूधारक होणार आहेत. त्यांचा रोजच्या जीवन जगण्यचा मार्ग बंद होणार आहे. महाराष्ट्र शासन गरज नसताना हा नवीन महामार्ग बांधत आहे. असे लोकप्रतिनीधीपासून ते सर्वसामान्यांचे मत आहे, कारण या शक्तिपीठ महामार्गाला कांही कि.मी. अंतरावरुन समांतर जाणारे अनेक चार-सहा पदरी मार्ग कार्यरत आहेत.
पर्यटकांना जवळचा मार्ग म्हणून आणि प्रवासाला लागणारा वेळ कमी व्हावा म्हणून हा महामार्ग बांधला जाणार असेल तर ते गैर आहे. फायद्यापेक्षा नुकसानीचे अधिक आहे. शासनाला पर्यटकांची खऱ्या अर्थाने सोय करायची असेल तर त्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा, एकंदरीत विचार करता या शक्तीपीठ महामार्गास शेतकरी, नागरीक तसेच लोकप्रतिनीधींकडून मोठ्याप्रमाणात तीव्र विरोध होत आहे. तरी सदरचा नागपूर ते गोवा जाणारा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग रद्द करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संजय नांदणे, माजी नगरसेवक संभाजी मोरे, सुरगोंडा पाटील, सुहास मगदूम आदी उपस्थित होते.
