झोपडपट्टी धारकांना मिळणार हक्काचे प्रॉपर्टी कार्ड ; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नाला यश
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला राजीव गांधी नगर झोपडपट्टी नियमिती करण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत होता. यासंबंधी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष लक्ष घालून मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची तातडीची बैठक घेऊन जयसिंगपूर शहरातील राजीव गांधी नगर झोपडपट्टी भागातील १५८१ घरांचे नियमितीकरण करण्याचा निर्णय झाला असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिले असल्याने जयसिंगपूर मधील कित्येक वर्षे प्रलंबित असलेला झोपडपट्टीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून झोपडपट्टी धारकांना आता हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत.
आखीव - आखीव जयसिंगपूर शहरात विकास कामांच्या माध्यमातून शहराचा कायापालट केला जात आहे. मात्र, जयसिंगपूर शहरातील राजीव गांधी नगर भागातील झोपडपट्टयांचे नियमितीकरण झाले नसल्यामुळे शहरातील महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. शहरातील अवचित नगर येथील घरांचे नियमितीकरण आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे. याच धर्तीवर येथील राजीव गांधी नगर झोपडपट्टी मधील १५८१ घरांचे नियमितीकरण होण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत बैठक घेऊन अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रशासनाला सूचना देऊन या संबंधित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बंडगर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, राहुल पाटील ( यड्रावकर), मुख्याधिकारी टीना गवळी, बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल चौगुले व अधिकारी उपस्थित होते.
