Top News

उदगावमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मुकुट खेळ संपन्न

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

हालगीचा ठेका आणि कैताळाचा आवाज, तुंतारीचा शिंनगार यांच्या संवादात उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी अकराशे वर्षाची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्यांच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा थरारक खेळ भाविकांनी आपल्या डोळ्यात टिपला. हा मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगांवमध्ये हजारो भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.

      गेल्या चार दिवसापासून उदगांव येथे जोगेश्वरी यात्रा सुरू आहे. शुक्रवारी श्री जोगेश्वरी मंदिरातून देवीची मुकूटे सकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात आली. एक नर, दोन मादीचे मुकुटे व सुपाचा मुकुटाच्या खेळाला सुरूवात झाली. प्रथम जोगेश्वरी मंदिर ते परटाच्या कमानीपर्यंत मुकुट खेळवण्यात आले. यात डोक्यावर मुकुट घेवून हातात वेताची काठी व पाठीमागे धारणारी व्यक्ती असते. यावेळी मुकुटाला खिदवून पळणार्या अनेक सवंगड्यांनी मुकुट धारकाच्या हातातील वेताच्या काठीचा मार झेलला.

     यात अनेक तरूण शालेय मुले, भाविकांनी मुकुट खेळून उत्साह वाढविला. गर्दीतून शिट्ट्या, टाळ्यांचा आवाज शिगेला गेला होता. त्यानंतर ग्रामपंचायत, गावचावडी, गणपती मंदिर, महादेवी मंदिरापयर्ंत खेळ खेळविण्यात आले. त्यानंतर 12 च्या सुमारास मुकुटाकडून नारळ देण्यात आला. मुकुटासमोर जाऊन तरूणांनी मकुटाची काठी न घाता नारळ उचलल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.

        त्यानंतर धार्मिक विधी व मानपान झाल्यानंतर मुकुट खेळाची सांगता झाली. या मानपानानंतर मुकुटे श्री जोगेश्वरी मंदिराकडे नेऊन मुकुटांची मंदिरात स्थापना करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडून कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगाव मध्ये हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री जोगेश्वरी देवीच्या गुरुवारी यात्रेच्या मुख्यदिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर श्री जोगेश्वरी देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री साडे सातच्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक ही अकराच्या सुमारास संपन्न झाली.

शेर शेरणी कराडणीच्यांन कोल्हापूरच्यांन महापूरच्यांन सत्य जोगणी सभा मिळाली उदं भलं उदंच्या गजरात शुक्रवारी मुख्य मंदीरात साडे सातच्या सुमारास देवीची पुजा व मानाच्या वाटीची पुजा करण्यात आली. त्यानंतर जोग्या व जोगणी यांना धार्मिक विधी करून मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील विविध समाजाकडून ओटी भरण्यात आली. त्यानंतर जुन्या हरिजन वाड्यातील थळोबा मंदिरात धार्मिक विधी झाल्यानंतर मिरवणूक रात्री अकराच्या सुमारास मंदिरात आणण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी उदगांवमध्ये रस्त्याच्या दुतर्फा हजारोच्या संख्येने उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने