शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
पावसाळ्यात संभाव्य आजाराच्या दक्षतेबाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबत येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग खटावकर यांनी संयुक्तपणे शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना सूचना दिल्या आहेत.ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कावीळ व डेंगू सदस्य यासह अन्य आजाराच्या दक्षतेबाबत घ्यावयाची खबरदारी व उपायोजना याबाबत सर्व ग्रामपंचायतला लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान , ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना मान्सूनपूर्व आरोग्य विभागाच्या बैठकीत आरोग्य दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत . या अनुषंगाने आरोग्य अधिकारी , कर्मचारी यांनाही सूचना देण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकारी घोलप यांनी सांगितले.
' शिरोळ तालुक्यातील हसुर येथे कावीळ सदृश्य्य रुग्ण आढळून आले असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे .या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने माहिती दिली.
तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाने यापूर्वीच सर्व ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्य दक्षतेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करावा, पुढील तीन महिने पुरेल इतका टीसीएल साठा उपलब्ध ठेवावा , गावातील पाणी योजनेमधील नळगळती व व्हॉल्व गळती त्वरीत काढावी, सर्व गटारी वाहत्या कराव्यात.
पाणी तुंबलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत ब डबकी मुजवून घ्यावीत , साठलेल्या पाण्यावर जळके ऑइल टाकावे ,सात दिवसापेक्षा जास्त पाण्याची साठवणूक होणार नाही यासाठी प्रसिद्धी करावी , आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आले आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता ठेवावी तसेच फ्रीज च्या मागील ट्रे , रिकामे टायर,अडगळतील फुटलेले वस्तू , उघड्यावर असणारी फुटकी भांडी ,नारळाच्या करवंट्या या वस्तूचा नायनाट करावा .सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गढूळ पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजाराचे काही रुग्ण आढळून येवू शकतात. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून प्यावे , योग्य ती खबरदारी घ्यावी,गरज भासल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ पांडूरंग खटावकर यांनी केले आहे
------------
