कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
किराणा दुकानात खाऊ देण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला बोलवून घेऊन लैंगीक अत्याचार केलेप्रकरणी आरोपी सुरेश सावळाराम वडर याला जयसिंगपूर येथील मा.अति.जिल्हा व सत्र न्यायाधिशसो, श्री.जी. बी.गुरवसो यांनी दोषी ठरवून चार वर्षाची सक्त मजूरी व दंड 2 हजार रुपये तर दंड न भरलेस 2 महिन्याची आणखीन सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावामध्ये 29 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी सुरेश वडरने त्याच्या किराणा मालाच्या दुकानात पीडित मुलगीला खाऊ देण्यासाठी बोलवून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि.स. कलम 376 (2) (1) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी वरून तपासी अधिकारी तथा तात्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर गुन्हयाची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश, श्री.जी.बी.गुरवसो यांचेसमोर चालू होती.सदर कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अँड.विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले.याप्रकरणी सरकार पक्षाने दाखल केलेले सक्षम पुराव्याचे व कागदोपत्रांचे अवलोकन करून आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले.मे.न्यायाधिशसो यांच्या समोर आलेले पुरावे व साक्षीदारांची झालेली साक्ष ग्राहय मानून व सरकारी वकील सरदेसाई यांचा युक्तीवाद ग्राहय माणून मा. सत्र न्यायाधिशसो श्री.जी.बी. गुरवसो यांनी आरोपीस दोषी धरून 4 वर्षाची सक्त मजूरी व दंड 2 हजार रुपये दंड न भरलेस 2 महिने सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.
