कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील पालिका चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू असून मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाने बंदसाठी केलेल्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारासह सर्वच घटकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील बाजारपेठ, दौलतशहा वली भाजीपाला मार्केटमध्ये शुकशुकाट होता.
दरम्यान मंगळवारी सकाळी शहरातून मराठा समाजबांधवांनी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी शहर दुमदुमून गेली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील मराठा समाज एकवटला असून येथील पालिका चौकात सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या पध्दतीने मात्र शांततेत आंदोलन करत आंदोलनाची तीव्रता वाढविली जात आहे. या आंदोलनाला शहरातील सर्वच समाजातील प्रमुख शिष्टमंडळ उपोषणस्थळी येवून समाजाचा पाठिंबा देत आहेत.
शहरासह शिरढोण, टाकवडे, हेरवाड व परिसरातील खेड्यांतही मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे.विविध जिल्ह्यांतील आंदोलनाच्या हिंसक घटनेमुळे कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
