Top News

शिरोळच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद : पालकमंत्री दीपक केसरकर



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तहसील कार्यालयाची जुनी इमारत व जागा शिरोळ नगरपरिषदेला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून नगरपालिकेच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येईल नाट्यगृह बांधकामाकरिता एक कोटी रुपये ऐतिहासिक छत्रपती ताराराणी तख्त वास्तूच्या 

जिर्णोधारा करिता एक कोटी रुपये आणि अग्निशमनसाठी ४० लाख रुपये निधी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री ना दीपक केसरकर यांनी दिले

येथील नगरपरिषदेच्या दीनबंधू भाई दिनकररावजी यादव सभागृहात पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विकास कामाबाबत आढावा बैठक झाली. नगरपालिकेच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी पालकमंत्री ना केसरकर यांच्यासह मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

   शिरोळ शहराच्या विकासासाठी अंतर्गत रस्ते , गटारी , नव्याने बांधकामासाठी नाट्यगृह , कलेश्वर तलाव परिसर सुशोभीकरण, नवीन सुधारित नळ पाणी पुरवठा योजना यासह महत्त्वपूर्ण कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेला मिळावा, अशी मागणी नगराध्यक्ष पाटील यांनी पालकमंत्री ना केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

    खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असे आश्वासन दिले आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ शहरातील विकास कामांची माहिती देऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

 या बैठकीस जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, जिल्हा प्रमुख रविंद्र माने, युवा सेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे उपनगराध्यक्षा करुणा कांबळे ,नगरसेवक राजेंद्र माने , योगेश पुजारी , पै प्रकाश गावडे ,रावसाहेब पाटील ,जयश्री धर्माधिकारी , कुमुदिनी कांबळे , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने