Top News

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे हेरवाडला मिळाला कायमस्वरुपी तलाठी

हेरवाड येथे नूतन तलाठी संतोष उपाध्ये यांचा सत्कार करताना सरपंच रेखा जाधव शेजारी उपसरपंच सचिन पाटील व ग्रामपंचायतचे पदाधिकारी.

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या सहा महिन्यांपासून ना तलाठी ना कोतवाल अशी स्थिती हेरवाड येथील तलाठी कार्यालयाची झाली होती, प्रशासनाने तात्पुरती तलाठ्यांची नियुक्ती केली, पण त्यांच्याकडेही दोन गांवे दिल्याने गावातील शेतकरी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे विविध कागदपत्रांसाठी मोठे हाल झाले, त्यामुळे शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे हेरवाड गावाला कायमस्वरुपी तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

हेरवाड गावाला कायमस्वरुपी तलाठ्यांची नेमणूक करण्यात यावी, यासाठी सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सचिन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले होते, तसेच स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनीही तहसिलदार यांची भेट घेवून कायमस्वरुपी तलाठीची मागणी केली होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकूमार पाटील यांनी महापुराच्या पाण्यात उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे दिपक बंडगर, देवगोंडा आलासे, प्रभाकर बंडगर, सुनिल शिरढोणे यांनी तहसिलदार यांना निवेदन देवून हेरवाड गांवाला कायमस्वरुपी तलाठी देवून महापुरात होणारे आंदोलन थांबविण्याची विनंती केली होती, याची दखल घेवून शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हेरवाडला कायमस्वरूपी तलाठी नेमण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

त्यामुळे प्रशासनाने हेरवाडला तातडीने तलाठीची कायमस्वरुपी नियुक्ती केल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, नूतन तलाठी संतोष उपाध्ये हे सोमवारी कार्यालयात हजर झाल्यानंतर सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य भरत पवार, विद्या माने, दयानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, हसन जमादार, अभिजीत माने आदींच्या हस्ते त्यांचा व शिरढोणचे तलाठी रवी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने