सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
माजी खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकातील ऐतिहासिक छत्रपती ताराराणी व छत्रपती राजाराम महाराज यांच्या तख्त परिसरास भेट देऊन त्यांनी गादीचे दर्शन घेतले, यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह मान्यवरांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी तख्त परिसराची पहाणी करून येत्या महिन्याभरात दुरुस्तीच्या कामास तात्काळ सुरुवात करून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन केले जाईल असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले, यावेळी त्यांनी 'तख्त 'च्या दुरुस्तीबाबत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्यासह काही मंडळींनी आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये त्या विधानाचा निषेध व सर्वत्र गोंधळ उडाला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल पुन्हा आक्षेपार्ह विधान करून काही मंडळींनी आपली पात्रता व लायकी सिद्ध केली आहे, हे एकाच वेळी या राज्यामध्ये घडतेच कसे ? निश्चितच यामागे षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असणार ? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, माझ्या पक्षाची ताकद काय आहे हे आगामी निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल असे सांगून संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत गेली अठरा वर्षे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी आग्रही आहे, तो प्रश्न निकालात काढावा यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा आहे ,मराठा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी जे जे काही करता येईल ते मी करत राहणार असून हा लढा माझा कायमपणे राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, माजी नगरसेवक बापू मोरे, पांडुरंग माने, संजय शिंदे,दगडू माने, गणपती कोळी, नितीन कोळी, किरण पाटील- कणंगलेकर, साजिद अत्तार ,तानाजी संकपाळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
