हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
एकमेकांतील हेवे- दावे, समाजात निर्माण होणारा तेढ आणि निवडणूकीमुळे भाऊबंदकीत होणारे वाद बाजुला करून गावच्या हितासाठी हेरवाडची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असा प्रस्ताव सत्ताधारी गटाच्या वतीने विरोधी गटातील काही प्रमुख मंडळींपुढे ठेवला असून उद्या दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्याकडे सदरचा प्रस्ताव ठेवून निर्णय घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे दत्त कारखान्यातून या निर्णयाला हिरवा कंदील मिळाला तर चर्चेअंती हेरवाडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
हेरवाड ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सत्ताधारी आर.बी. पाटील आणि विरोधी दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांची आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. दोन्ही आघाड्यांकडून सरपंच व सदस्य पदासाठी ज्या - त्या वार्डातून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत. दरम्यान, सत्ताधारी गटाकडून गावातील एकोपा टिकून राहावा यासाठी बिनविरोधचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे समजते, या वृत्ताला खुद्द मा. सरपंच सुरगोंडा पाटील यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, एकमेकांतील हेवे- दावे, समाजात निर्माण होणारा तेढ आणि निवडणूकीमुळे भाऊबंदकीत होणारे वाद बाजुला करून गावच्या हितासाठी व विकासासाठी हेरवाडची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असा प्रस्ताव आम्ही विरोधी आघाडीतील प्रमुख मंडळींच्या पुढे ठेवला आहे. उद्या मंगळवारी सकाळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याने, कारखान्यावर होणाऱ्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला तर चर्चेअंती हेरवाडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
अडीच - अडीच वर्षाचा ठरणार फॉर्म्युला..?
हेरवाडची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला तर दोन्ही गटातील सरपंच व सदस्यांना अडीच - अडीच वर्षे संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्ष असलेल्या सरपंच व सदस्यांनी राजीनामा देऊन त्यानंतर पुढील अडीच वर्षाची निवडणूक बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.

