Top News

आधुनिकतेची कास हाच यशाचा मंत्र - गौतम कोतवाल


पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

 सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात सर्वात जास्त महत्त्व हे माहितीला आलं आहे. योग्य माहितीचा वापर योग्य ठिकाणी केला तर कुठलाही व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ज्याच्याकडे जास्त व दर्जेदार माहितीचा स्त्रोत तोच या जगात यशस्वी हा मंत्रच बनला आहे. त्यामुळे आधुनिकतेची कास हाच यशाचा मंत्र आहे, असे उद्गार लेखक गौतम कोतवाल यांनी त्यांनी लिहीलेल्या ‘शुद्ध बीजापोटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाच्या प्रसंगी काढले. या पुस्तकात कर्तृत्ववान व्यक्तींची कर्तृत्ववान मुलं ही संकल्पना घेवून पुस्तकाचं लिखाण केलं आहे. या पुस्तकात 28 दुसर्‍या पिढीतील तरूण उद्योजकांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.  

 व्यावसायिक वारसा मिळालेल्या तरूणांनी आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवली पाहीजे. त्यांनी केलेले कष्ट, त्याग, सतत डोळयासमोर ठेवून त्याच आदर्शांवर वाटचाल करा, यश तुमचंच आहे. जगात कष्टाला कुठलाही शॉर्टकट नाही. व्यवसायात अपार कष्ट करा यश मिळवा, परंतू त्याच वेळेस सामाजिक बांधिलकीचीही जाणीव ठेवा असे उद्गार प्रसिद्ध उद्योजक फतेचंद रांका यांनी या कार्यक्रमात काढले. 

 कार्यक्रमाच्या प्रसंगी अ‍ॅक्युरेट गेजींग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम साळुंके म्हणाले, कष्टाला स्मार्ट वर्कची जोड दया. नवीन संधी शोधा. भारतात येणार्‍या काळात उत्पादन व कृषी क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. कार्यक्रमाचे आयोजन ट्रिनिटी शिक्षण संकुलनात केलं होतं. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव म्हणाले नवीन पिढीला अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत, त्याचा उपयोग व्यावसायिक प्रगतीसाठी करा. दुसर्‍या पिढीतील उद्योजकांनी व्यवसाय सुरू करताना आधीच्या पिढीने घेतलेले कष्ट कायम स्मरणात ठेवावे. येणार्‍या काळात ट्रिनिटी शिक्षण संकुलनात मोठं कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार आहे. अनेक गोरगरीबांवर माफक दरात इथे उपचार केले जातील. 

 याप्रसंगी उद्योजक दिपक कुदळे, विकास रासकर यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. या पुस्तकात प्रकाशित केलेल्या यशोगांथापैकी सौरभ व स्वप्नील अमराळे, अभिषेक बोबडे, गौरव घुले, ओंकार जाधव, गिरीश कोंढरे, सौरभ व सिद्धार्थ कुंजीर, अनघा पवार, डॉ. गौरी व डॉ. सौम्या साबळे, अजितेय ताम्हाणे, निखील व निलांबरी तुपे यांचा सन्मान करण्यात आला. 

 आभार प्रदर्शन, ट्रिनिटी शिक्षण संकुलनाच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव यांनी केलं. नव्या पिढीपुढील, आव्हानांचं स्वरूप वेगळं आहे. या आव्हानाला सामोरं जाताना वडिलधार्‍यांचं मार्गदर्शन त्या-त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान गरजेचं आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रसिका तुळजापूरकर व दिप्ती कुलकर्णी यांनी केलं.



थोडे नवीन जरा जुने