Top News

राजू शेट्टी यांच्या चळवळीचे साक्षीदार बयाजी हरपले



राहूल चौगुले / शिवार न्यूज नेटवर्क :

      शिरटी ता. शिरोळ येथील बयाजी गणू भोसले (वय ९०) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते गावातील प्रसिद्ध हालगीवादक होते. अंगाने सडपातळ आणि काटक असणाऱ्या बयाजीने शेवटपर्यंत हलगी वाजवण्याचे काम करून ग्रामस्थांची सेवा केली .गावात कोणतेही शुभकार्य असो, लोकांना हलगी वाजविण्यासाठी बयाजीच हवा. या कामासाठी कोणाकडूनही हट्टाने पैसे मागून न घेता मिळेल तितके पैसे घेऊन ते हलगी वाजविण्याचे काम करायचे. मातंग समाजातील बयाजीला लोक शुभकार्यप्रसंगी मानाचे स्थान देत होते. त्याचे शनिवारी रात्री ९ वाजता निधन झाले.

        बयाजी आणि मा.खासदार राजू शेट्टींचे एक अनोखे नाते होते. त्यांचा किस्सा असा की, ३१ वर्षापूर्वी शिरटी या गावात शेट्टींनी चळवळीच्या निमित्ताने पाऊल ठेवले. गावात लोकांना एकत्रित करण्यासाठी त्यावेळेस माईकची सुविधा नव्हती. त्यामुळे शेट्टी गावात येणार म्हटल्यानंतर बयाजी हे स्वतःची हलगी येऊन त्यांच्यापुढे वाजवत जायचे व लोक हलगीचा आवाज ऐकून मंदिरात जमा व्हायचे. लोक एकत्र आल्यानंतर चवळीस आर्थिक मदत म्हणून पैसे गोळा करायचे आणि राजू शेट्टींना द्यायचे. ही गोष्ट ही गोष्ट जेव्हा बयाजींच्या लक्षात आली तेव्हा बयाजीनेही आपल्या फाटक्या सदऱ्यातील खिशात हात घालून मदत म्हणून शेट्टी यांच्या खिशात दहा रुपयांची नोट घातली. तेव्हापासून राजू शेट्टी जेव्हा गावात येतील त्यावेळेला न चुकता स्वतःच्या खिशातून दहा रुपये बयाजी त्यांना द्यायचे तसेच महिन्यातून एकदा त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामदैवत भैरेश्वराचा अंगारा व दहा रुपयाची नोट त्यांना देऊन परत मागे फिरायचे. आशा या बयाजीच्या निधनाने चळवळीची साथ सुटल्याचा शोक सोशल मिडियाद्वारे शोक व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने