Top News

युवकांनी परिस्थिती बदलण्यासाठी महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजेत : प्रा गणेश शिंदे

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       शिक्षकांनी मुलां मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलल्या बाबतची शिक्षण देणे काळाची गरज आहे. आणि याच युवकांकडून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा पुणे येथील व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ आंबेडकर विचार मंचतर्फे रविवारी (ता.२५) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनाच्या पटांगणावर आयोजित शाहू,फुले आंबेडकर विचार संमेलनात 'तरुणांनो परिवर्तनवादी महापुरुषांच्या समतेच्या विचारातून आपले जीवन सुंदर बनवूया' या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

   पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, समाज व्यवस्था बदलण्यासाठी केवळ मोर्चा आंदोलने नको असून प्रत्येकांनी जागृत बनले पाहिजे. महिलांनी अपयशाची कारणे न सांगता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन विचाराची प्रगल्भता वाढवून मुलांना वेळ देऊन स्वावलंबी बनविले पाहिजे. भौतिक सुखावर कधीही समृद्ध होऊ शकत नाही. संवादाची साधने वाढली असून कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. विचारांच्या जोरावर संवाद वाढवावा लागेल. शैक्षणिक गुणांच्या पलीकडे जाऊन समाजात जगण्यासाठीचे शिक्षण दिले पाहिजे. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून समाजातील वाईट पद्धती बदलण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.

दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी, सध्याच्या युगात जातीला चुना आणि धर्मग्रंथाला थुका लावला जात आहे. समाज बदलण्यासाठी ज्ञान महत्त्वाचे असून तो शिक्षणाचा पहिला डोळा असला पाहिजे. स्वार्थासाठी राजकारण सुरू असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. शिवराय ते भिमराय समजून घ्यायला तरुण पिढी तयार नाही. प्रत्येकाने संविधान समजून घेतले पाहिजे. मत विकल्यास देश विकला जाईल. मेंदूमध्ये डॉ. आंबेडकर आणि दंडाममध्ये शिवरायांची ताकद असल्यास केवळ निवडणुकीतच नव्हे तर निरंतरपणे गांधीजी ची नोट आपोआपच आपल्या खिशात बसतील, असे सांगून चंदनशिवे यांनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. क्रांतीज्योती महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रबोधन गीत सादर केले. अमित शिंदे यांनी स्वागत तर प्रा. सुरेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कपिल कांबळे व सहकाऱ्यांनी धम्म वंदना दिली.

यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले,नगरसेविका अनिता पठाडे, राजेश कदम, अशोककुमार असोदे, ॲड. अविनाश कट्टी, राजेंद्र वडर, जयवंत कांबळे, प्रवीण सुतळे, राजू पवार, विजय मेत्राणी, सुधाकर माने, अशोक लाखे यांच्यासह निपाणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. दीपक शेवाळे, नविजन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण माने यांनी आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने