Top News

'अहिंसा' आंतरराष्ट्रीय पुरस्काराने संजय घोडावत फाउंडेशनचा सन्मान

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क

अहिंसा विश्वभारती आणि जागतिक शांतता केंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित अहिंसा विश्वभारती राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी संजय घोडावत फाउंडेशनला अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

       सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना अहिंसा विश्वभारती आणि जागतिक शांतता केंद्राच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी केंद्राचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश जी, श्री जयंत जैन, श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर, जितो अपेक्स आणि संजय घोडावत, पत्नी नीता घोडावत व इतर मान्यवर उपस्थित होते. हे पुरस्कार वैयक्तिक, सीएसआर, संस्थात्मक पातळीवर दिले जातात. एक सशक्त, चांगला आणि प्रभावी समाज घडविण्यात संजय घोडावत फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि गुरुदेव राकेश भाईजी यांनाही अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या प्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले, की भारत ही संतांची ऋषीमुनींची भूमी असून भगवान महावीर ,गौतम बुद्ध यांच्या मार्गाने चालल्यास जगात अहिंसा आणि शांतता नांदेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुभेच्छा देताना अहिंसा विश्वभारती आणि जागतिक शांतता केंद्राच्या समाज उपयोगी कार्याचे तसेच संस्थापक आचार्य लोकेश जी यांच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की त्यांनी भारतीय संस्कृती आणि भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश भारतातच नव्हे तर जगभर पोहोचवून देशाला अभिमान मिळवून दिला आहे.

        संजय घोडावत फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये ५ लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम अशा आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३७ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले. फाउंडेशन च्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनेक ज्येष्ठांना होत आहे. सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी तीन लाखांच्या वर वृक्षारोपण करण्यात आले. कोल्हापुर सांगली परिसरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी संस्थेने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली. ज्याचा लाभ ५२ ग्रामीण भागात राहणाऱ्या ६ हजार विद्यार्थिनी घेतात. त्याचबरोबर मिरज येथे अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करून त्यांचे आयष्य प्रकाशमय करण्याचे महत्वाचे कार्य फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचा उल्लेख संयोजकांनी आपल्या भाषणात केला.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत म्हणाले, की आतापर्यंत फाउंडेशनने केलेल्या अपार कष्टामुळे हा पुरस्कार मिळालाय. त्याचा नम्र पूर्वक स्वीकार करतो. समाजामध्ये आपण राहत असताना दानधर्म करणे, परोपकार करणे, इतरांचा चांगला विचार करणे हाच जगण्याचा खरा दागिना आहे तो सर्वांनी परिधान केला पाहिजे. आपले सकारात्मक विचार जीवनात परिवर्तन घडवू शकतात. जगातली कुठलीही भौतिक गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नाही परंतु इतरांना केलेली मदत ही नेहमी समाधान देते. परोपकाराची शक्ती ही अफाट आहे. आणि चांगले कार्य करत राहणे हेच आपल्या फाउंडेशनचे तत्व आहे. यामध्ये काम करणाऱ्या सर्वांचेच त्यांनी कौतुक करत आभार मानले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून संजय घोडावत यांचे अभिनंदन होत आहे.

     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले कौतुक

संजय घोडावत यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला नेहमीच देण्याचे कार्य केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी ८० वेळा रक्तदान करून समाजाला रक्ताचेही दान दिले आहे,असा आवर्जून उल्लेख करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संजय घोडावत यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

थोडे नवीन जरा जुने