चिंचवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
चिंचवड येथील ग्रा. प. कर्मचाऱ्यांचे पगार व फंड थकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आज मंगळवारी चिंचवाड गावात पाणीपुरवठा न झाल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे.
चिंचवाड येथील ग्रा. प. कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे त्यांनी दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन दिले होते. निवेदनात पाच महिन्यापासून पगार नाही, गेली पाच वर्षाचा फंड व फरक जमा केला नाही. याबाबत वारंवार आवाज उठूवून ही कोणीही दखल घेत नसल्यामुळे अखेर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून आपला निषेध नोंदवला आहे. सोमवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने पाणी बंद होते. दोन दिवस पाणी नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुकाणू समितीच्या सदस्यांनी बैठक घेऊन स्वतः ग्रा. प. कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे मान्य केल्यानंतर रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आंदोलनात लिपिक राजेंद्र भोसले, मोहन गोधडे यांच्यासह सुकाणू समितीचे अजित चौगुले, सुरगोंडा पाटील, राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच सचिन पाटोळे, वैभव गोधडे, भरत पाटोळे, प्रमोद ककडे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थित बैठक पार पडली.
