उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्यासोबतच्या बैठकीत झाली सकारात्मक चर्चा
शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यामध्ये नवीन शासकीय औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आपण शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडे सातत्याने आग्रह धरला होता, या कामी जमिनीचा सर्वे करणे व कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाने प्रस्ताव तयार करून मुख्यालयास सादर करणे या प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या होत्या, याच विषयावर मंगळवारी उद्योग मंत्री तथा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्यामुळे शिरोळ तालुक्यात शासकीय औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, नियोजित शासकीय औद्योगिक वसाहतीची गरज व यामुळे उद्योग व्यवसायाला मिळणारी चालना याबाबत बैठकीत आपण माहिती दिली असल्याचे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सध्या जवळपास 200 वर उद्योजक नव्याने होणाऱ्या या वसाहतीमध्ये प्लॉट मिळण्यासंदर्भात आग्रही असल्याचे बैठकीत सांगितले,सध्या उपलब्ध असलेली व कोणतेही अतिक्रमण नसलेली 37 हेक्टर जमीन तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले, अतिक्रमण असलेल्या जमिनी बाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तपासून कार्यवाही करावी याबाबतच्या सूचना महामंडळ अधिकाऱ्यांना नामदार सामंत यांनी दिल्या, नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी सध्या कोणतीच अडचण नाही त्यामुळे उपलब्ध जमीन तातडीने ताब्यात घेऊन औद्योगिक वसाहत स्थापने संबंधित कार्यवाही करावी असे निर्देशही मा.
मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रंगा नायक, औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र गुंडले, उमेश देशमुख जमीन संपादन विषयक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी श्री. भिंगार्डे,इचलकरंजी चे प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
