Top News

२९ हजार ४८४ पैकी २४ हजार १७५ गायींचे लसीकरण पूर्ण

 आज पर्यंत ५ गायींचा मृत्यू, बाधितांची संख्या २७ वर

शिवार न्यूज नेटवर्क :

५ गायींच्या मृत्यूमुळे शिरोळ तालुका लम्पीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. पशुवैद्यकिय विभागाच्या वतीनेही शर्थीचे प्रयत्न करुन सध्या २९ हजार ४८४ जनावरांपैकी सुमारे २४ हजार १७५ जनावरांना लम्पी त्वचारोगाची लस देण्यात आली आहे. याचबरोबर सध्या तालुक्यात २७ हून अधिक जनावरे लम्पीग्रस्त आहेत. सदरची लसीकरण मोहिम मंगळवारी सायंकाळी पूर्ण होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र कुरुंदवाडे यांनी दिली.

शिरोळ तालुक्यातील जांभळी हे गांव लम्पीचे हॉटस्पॉट बनले असून येथील मोटके यांच्या गोठयातील ४ गायींचा लम्पी या आजाराने मृत्यू झाला आहे. याचबरोबर या गोठ्यातील अनेक गायींना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जांभळी येथे भेट देवून माहिती घेतली व पशुवैद्यकिय विभागाला सक्त सूचना केल्या आहेत. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील पशुवैद्यकिय विभागात अपुरे कर्मचारी असूनही लम्पीचा सामना करण्यासाठी झटत असल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या शिरोळ तालुक्यात २९ हजार ४८४ जनावरांपैकी सुमारे २४ हजार १७५ जनावरांना लम्पी त्वचारोगाची लस देण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त कुरुंदवाडे यांनी दिली. तसेच शिरोळ तालुक्यात २७ हून अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यापैकी कुटवाड येथे १ व जांभळी येथील ४ गायींचा मृत्यू झाला आहे. उद्या मंगळवारी सायंकाळपर्यंत शिरोळ तालुक्यातील संपूर्ण लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहितीही सहायक आयुक्त कुरुंदवाडे यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने