हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाडमधील वार्ड नं ३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांतून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने अद्यापही या भागात कोणतीही उपाय योजना राबविण्यात आलेली नाही, त्यामुळे डेग्यूचे रुग्ण वाढण्याच्या आत गावामध्ये उपाययोजना करण्याची गरज आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे, त्यामुळे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. गावातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे समजते, मात्र ही बाब संबंधित विभागाला माहित नसल्यामुळे डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर या प्रभागात उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर औषध फवारणीसह जनजागृती करावी अशी मागणी केली जात आहे.
