Top News

दत्तवाड येथे शाळेच्या लगतच बेकायदा मद्यविक्री जोमात

 


इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क

दत्तवाड ( ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या शाळेच्या लगतच चोरून देशी -विदेशी, गावठी हातभट्टी मद्याची बेकायदा विक्री करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. या ठिकाणी विनापरवाना चोरून मद्य विक्री होत आहे. अशा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाने कंबर कसण्याची गरज आहे.

बेकायदेशीर विनापरवाना मद्यविक्री च्या माध्यमातून त्यांनी चांगले जम बसवलेला आहे. कारवाई झाली तर पंटरला बकरा करून काही दिवसात पुन्हा त्याचा धंदा जोरात सुरू होतो. शाळेच्या आवारामध्ये मद्य विक्री करण्यास बंदी असताना सुद्धा शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून परवाना नसतानाही बिनधास्त दारू विक्री होत असल्याचे या ठिकाणी पहावयास मिळत आहे. या ठिकाणी असणाऱ्या अवैद्य मद्य विक्री च्या अड्ड्यामुळे येथील नागरिकांना मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा हे विद्येचे माहेरघर असून शाळेच्या लगतच गावठी हातभट्टी दारू ची विक्री जोमात सुरू आहे. या अड्ड्यामुळे शाळेत शिकण्यास येणाऱ्या लहान मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावठी अड्ड्यावर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते पण कारवाईच्या दुसऱ्या दिवसापासून हे अड्डे पुन्हा सुरू होतात.

अवैद्य विनापरवाना मद्यविक्री बंद करायचे पोलिसांनी ठरवले तर काही तासात म्हणण्यापेक्षा काही क्षणात हा धंदा ते बंद करू शकतात. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दत्तवाड येथील शाळेच्या आवारातच सुरु असणारा अवैद्य विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्या अड्ड्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व हा अड्डा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांतून जोर धरत आहे.


दत्तवाड या ठिकाणी शाळेच्या आवारात सुरू असलेल्या या अवैद्य मद्य विक्रीच्या अड्ड्यावर देशी-विदेशी मद्याबरोबरच गोवा बनावटीची दारूची सुद्धा विक्री होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने