Top News

अबब... पोलिस नाईकने मागितली एक कोटीची लाच


शिवार न्यूज नेटवर्क :

शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल क्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलीस मुख्यालया कडील पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराचे देहुगाव ता. हवेली, जि. पुणे येथील शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. याप्रकरणी जॉन तिवडे यानं तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगत तुमच्या विरुध्द असलेली पार्टी एक कोटी देण्यास तयार आहे त्यामुळं केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून द्यायचा असेल तर तुम्ही किती रुपये देऊ शकता अशी विचारणा करत लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि. २२ मार्च २०२२ रोजी शासकीय पंचासमवेत एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पडताळणी केली. यावेळी पडताळणीत तिवडे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जॉन तिवडेनं तब्बल एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.



थोडे नवीन जरा जुने