Top News

शेडशाळ : कुत्र्यांच्या हल्ल्यात १८ मेंढ्या ठार

 शेडशाळ / शिवार न्यूज नेटवर्क :

       शेडशाळ(ता.शिरोळ) येथील शिवमूर्ती देशिंगे यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला करून 18 मेंढ्या ठार केल्या,5 मेंढ्या गंभीर जखमी केल्या आहेत तर 6 मेंढ्या बेपत्ता आहेत.ही घटना गुरुवारी रात्री मध्यरात्री सुमारास घडली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.अविनाश विठ्ठल गुपचे(रा.शेडशाळ) या मेंढपाळाचे 4 लाखाचे नुकसान झाले आहे.

     शेडशाळ येथील देशींगे यांच्या शेतात मेंढपाळ गुपचे याच्या मेंढ्या मेंढी-खतासाठी दोर जाळीचे कुंपण घालून सोडण्यात आल्या होत्या.गुरुवारी मध्यरात्री कुत्र्यांच्या झुंडीने कळपातील 18 मेंढ्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने त्या ठार झाल्या.तर 5 मेंढ्यांचे लचके तोडल्याने गंभीर जखमी आहेत.तर 6 मेंढ्या बेपत्ता असून कुत्र्यांनी त्या पळवल्याचा अंदाज आहे. या हल्ल्याने मेंढपाळ वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दानोळी, हेरवाड-तेरवाड नंतर आता शेडशाळ परिसरात मेंढ्यांच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने मेंढपाळ वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीबद्दल खंत व्यक्त करत मेंढपाळ गुपचे यांना नुकसान भरपाईची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.वनरक्षक मच्छिंद्र नवाळे यांनी मृत मेंढ्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पाहणी केली.मंडळ अधिकारी बबन पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे.तर जखमी मेंढ्यांच्यावर कुरुंदवाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत.

     वन्य प्राणी हे जनावरांच्या पोटावर हल्ला चढवून मांस खातात. आणि त्यांच्यात 2 ते 3 जनावरावरच हल्ला करण्याइतकी ताकत असते.कळपावर हल्ला भटकी कुत्रीच करू शकतात आणि लचके तेच तोडतात याठिकाणी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्याचे लचके तोडले आहेत.त्यामुळे हा हल्ला कुत्र्यांचा आहे. 

- मच्छिंद्र नवाळे. वनरक्षक हातकणंगले-शिरोळ

थोडे नवीन जरा जुने