Top News

देवदर्शन करून परतत असताना झालेल्या अपघातात दांपत्य ठार

 निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 कोल्हापूरातील राधानगरी-सरवडे रोडवर बोरवडे पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कोडणी (ता. निपाणी) येथील दाम्पत्य जागीच ठार झाले. भैरवनाथ आप्पासाहेब पाटील उर्फ कोराने (वय 45) व पूनम भैरवनाथ पाटील उर्फ कोराने (वय 40) अशी ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना काळाने घाला घातल्याने कोडणी गावावर शोककळा पसरली आहे. कोडणी येथील भैरवनाथ पाटील हे गायकवाडी हद्दीतील शेतवडीत कुटुंबीयासह राहतात. ते पत्नी पूनम यांना घेऊन शुक्रवारी सकाळी बारा वाजता गावातून देवदर्शनाला दुचाकीवरून गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना बोरवडेजवळील (ता. कागल) पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची(के.ए.22 सी.1981) दुचाकीला(के.ए.23 इ. डी. 553 ) समोरून धडक बसली. धडकेनंतर भैरवनाथ व पूनम हे जोराने बाजूला फेकल्याने त्यांचे डोके आदळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद मुरगूड (ता. कागल) पोलिस ठाण्यात झाली असून पाटील यांच्या पश्चात आई, भाऊ, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

थोडे नवीन जरा जुने