निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सर्पदंश झाल्याने लखनापूर येथील सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. आनंदा पांडुरंग पोवार (वय 28) असे या सर्प मित्राचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा पोवार हा लखनापूर परिसरात सर्पमित्र म्हणून कार्यरत होता. शेतीवाडीसह इतर ठिकाणी तो काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.लखनापूर गावात काम करताना त्याला 30 मे रोजी विषारी सर्पाचा दंश झाला. तात्काळ त्यांना निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस उपचार सुरू असतानाच प्रकृतीने साथ न दिल्याने त्याचा अखेर गुरुवारी मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
