इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क
दत्तवाड परिसरात चोरून देशी विदेशी मद्याची बेकायदा विक्री करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी विनापरवाना चोरून मध्ये विक्री होत आहे. अशा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाने कंबर कसण्याची गरज आहे.
बेकायदेशीर विनापरवाना मद्यविक्री च्या माध्यमातून अनेकजण 'गब्बर' झाले आहेत. कारवाई झाली तर पंटरला बकरा करून काही दिवसात पुन्हा त्यांचा धंदा जोरात सुरू होतो. परवाना नसतानाही चोरून दारू विकणार्यांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. केवळ मद्यपींनाच हे पत्ते माहित असतात. आपली सोय होत असल्याने मद्यपी या कानाची खबर त्या कानावर लागणार नाही याची दक्षता घेतात. मद्य निर्मिती व विक्रीतून शासनाला दरवर्षी कोट्यवधीचा महसूल मिळतो. मात्र गावठी हातभट्टी दारू करणारे शासनाच्या महसुलात अडथळा ठरतात त्यामुळे गावठी अड्ड्यावर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते पण कारवाईच्या दुसऱ्या दिवसापासून हे अड्डे पुन्हा सुरू होतात.
अवैद्य विनापरवाना मद्यविक्री बंद करायचे पोलिसांनी ठरवले तर काही तासात म्हणण्यापेक्षा काही क्षणात हे सर्व धंदे ते बंद करू शकतात. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दत्तवाड परिसरात सुरु असणारी अवैद्य विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांतून जोर धरत आहे.
