जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामीण भागात गावापासून स्वतःच्या शेतापर्यंत जाण्यासाठी वर्षानुवर्षे पाणंद रस्त्यांचा वापर केला जातो हे रस्ते मजबूत व्हावेत आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्याबरोबरच शेतीमालाची ने आण करणे सुलभ व्हावे यासाठी गावागावातील पाणंद रस्ते मजबूत करावेत अशी मागणी शेतकरी सातत्याने करीत होते, याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यात शेत पानंद रस्त्यांसाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे, या रस्त्यांच्या कामांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ता ही योजना अस्तित्वात आणली असून याच योजनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या गाव गावातील १०५ किलोमीटर लांबीच्या शेत पानंद रस्त्यांसाठी २५ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे,या निधीअंतर्गत होणाऱ्या कामांना नियोजन विभाग (रोहयो विभाग) शासनाच्या या विभागाकडून २०२२-२०२३ च्या आराखड्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे, शिरोळ तालुक्यात पहिल्या टप्प्यात सध्या झालेल्या मंजूर निधीमधून निश्चित केलेली कामे लवकरच सुरू होतील त्यानंतर आणखी १०० किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध होऊन मिळावा यासाठीची मागणी आपण केली असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे, या रस्त्यांसाठी प्रति किलोमीटर २४ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून यांत्रिकीकरण, मुरमीकरण व खडीकरण तसेच जॉब कार्ड या पद्धतीने या रस्त्यांची कामे होणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे, शेत पाणंद रस्त्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदाच उपलब्ध होत असून यामुळे गावागावातील शेतकरी आणि शेत वस्तीवर राहणारे ग्रामस्थ यांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे
या संपूर्ण कामासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगताना मंत्री यड्रावकर यांनी या सर्वांसह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
