कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
दिवसा दहा तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या ९ दिवसापासून कोल्हापुरात धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप सरकारने आपला निर्णय दिला नाही , पुढील आंदोलन अधिक तीव्र करत दि. 4 मार्च रोजी राज्यातील शेतकर्यांच्या वतीने ग्रामीण भागात राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्यावतीने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र अद्याप तारीख कळवलेली नाही. वेळ पाहून निरोप देतो असे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतीला दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी गेल्या ९ दिवसापासून महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मारून बसलो आहोत. मात्र अद्याप महावितरणला जाग आली नाही. आंदोलनाचा दुसरा टप्पा ४ मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामधून सरकारने तोडगा नाही काढला तर आंदोलन अधिक व्यापक होईल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारचीच राहिल. चर्चेचा दरवाजे आम्ही बंद केले नाही. ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचा आजच फोन आला होता. चर्चा का करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर त्यांना मी म्हणालो, "आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी जिल्ह्यातील मंत्र्यांना कळवली होती." मात्र त्यांनी ऊर्जामंत्र्यांना काय सांगितले हे माहिती नाही. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जयकुमार कोले, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, विठ्ठल मोरे, विक्रम पाटील, वसंत पाटील, धनाजी पाटील, संदीप कारंडे, आशिष समगे आदी उपस्थित होते.