Top News

गौण खनिज आणि स्टोन क्रशर बाबत लवकरच तोडगा

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पुढाकाराने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत सकारात्मक चर्चा



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

हरित लवादाकडील पर्यावरणाचा दाखला असल्याशिवाय दगड उत्खनन व स्टोन क्रशर चालवता येणार नाहीत या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी दगड उत्खनन करणाऱ्या खाण मालक, मजूर सोसायट्यांना व स्टोन क्रशर मालकांना आपले व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते, यानंतर एक मार्च पासून सर्व संबंधितांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते, या व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या व्यवसायावर आलेल्या संकटाबाबत माहिती दिली, यावर नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तातडीने हालचाल करत बुधवारी या संपूर्ण व्यवसायिकांच्या शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबई येथे भेट घेऊन या व्यावसायिकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली, दगड उत्खनन करणाऱ्या खाणी आणि स्टोन क्रशर बंद झाल्या तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल त्याचबरोबर सर्व प्रकारचा बांधकाम व्यवसाय आणि रस्ते उभारणीची कामे ठप्प होतील असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले, यावेळी या व्यवसायिकांच्या प्रश्नावर आपण लवकरच योग्य तोडगा काढू असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना दिले,

संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या दगड उत्खनन व स्टोन क्रशर व्यवसायिकांना व या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मुंबईत झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे दिलासा मिळाला आहे,

बुधवारी झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत त्यांचे खाजगी सचिव रविंद्र धुरजड, अर्जुन देशमुख, महेश कलकुटगी, शकील गैबान, मिलिंद साखरपे, पप्पू पाटील, अभिजित पवार, अनुप चौगुले, बंटी वोरा, अंकुश पवार उमेश पवार, यांच्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील या व्यवसायातील मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने