चंदूर येथे १० वे ग्रामीण साहित्य संमेलनात होणार सन्मान
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळचे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुनील इनामदार यांच्या "बळी" या कादंबरीला ग्रामीण कादंबरीकार कै. शंकर बाबाजी पाटील यांच्या स्मरणार्थ "राज्यस्तरीय प्रेरणा कादंबरी" हा पुरस्कार जाहीर झाला आहे, चंदूर येथे रविवारी 6 मार्च रोजी साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे १० वे ग्रामीण साहित्य संमेलन होत असून ग्रामीण कादंबरीकार स्व शंकर बाबाजी पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ही निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुनील इनामदार यांनी सामाजिक चळवळी बरोबरच कथा-कादंबरी यांचे विशेष लेखन करून साहित्यक्षेत्रात लौकिक मिळवला आहे. कवी, लेखक व साहित्यिक म्हणून त्यांचा परिचय असून यापूर्वी त्यांना साहित्य लेखनासाठी विशेष पुरस्कारही मिळाले आहेत, गेली 40 वर्षे सामाजिक व साहित्य क्षेत्रात त्यांनी काम केले असून साहित्य सहयोग व शब्दगंध साहित्य परिषद या माध्यमातून त्यांनी नामवंत साहित्यिका बरोबरच नवोदित कवीं व लेखकांना साहित्य लेखनाची प्रेरणा दिली आहे.