शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्याला विचारांची, परंपरांची, लढण्याची आणि चळवळींची मोठी परंपरा आहे. या सर्व गोष्टींना पुढे आणण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. इंद्रधनुष्य मासिक हे समाजाचे प्रतिबिंब व्हावे, कोल्हापूरचा आवाज अशी मासिकाची ओळख निर्माण व्हावी आणि लेखकांचा तसेच तरुण पिढीचा विकास घडविणारी इंद्रधनुष्य मासिक ही शक्ती बनायला हवी, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
इंद्रधनुष्य मासिकाच्या वतीने श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या लेखक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गझलकार, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी हे होते. तर संपादक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पी म्हणाले, नव्याने काळजाला भिडणारे, नव्या वर्तमानाचा वेध घेणारे साहित्य प्रकाशित झाले पाहिजे. विधायक विचार पुढे नेणारे तसेच वाचकाभिमुख आणि वर्तमानाशी सुसंगत, गल्लीपासून जगापर्यंत सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे तसेच तरुणांना मार्गदर्शन करणारे ललित, वैचारिक अशा सर्व प्रकारचे साहित्य समोर येणे गरजेचे आहे. मासिक इंद्रधनुष्यचा लेखक, कवी, साहित्यिक घडविण्याचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, भारतीय राज्यघटनेची मूल्ये रुजविणे म्हणजेच मानवतेचा जाहीरनामा रुजविणे असून हे काम प्रामुख्याने वृत्तपत्रांचे, समाजमाध्यमांचे आहे. सध्याचा कालखंड अस्वस्थ करणारा आहे. आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला होताना हात शिवशिवणार नसतील तर उपयोग नाही. संविधान मूल्यांची पुनर्स्थापना, प्रश्नांची सोडवणूक, मूल्ये रुजविणे आणि मानवतेला दीशा देण्यासाठीचे काम इंद्रधनुष्यच्या माध्यमातून व्हावे. यावेळी रावसाहेब पुजारी, भीमराव धुळूबुळू, डॉ. ऋषिकेश मेटकरी, प्रा. आबासाहेब शिंदे, शामराव कुलकर्णी, डॉ. ज्युबेदा तांबोळी, प्रा. अशोक दास, वैशालीताई नायकवडे, नामदेव भोसले, रघुराज मेटकरी, वसंत हंकारे,ऋजुता माने आधी साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी साहित्यिक डॉ. राजश्री पाटील लिखित बोचऱ्या सुया (अनुभवकथन), ती अजुनही जळत आहे (काव्यसंग्रह) व देहदंश (कथासंग्रह) या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. दिलीप शिंदे, दयासागर बंने व नीलम माणगावे यांनी वरील प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर अनुक्रमे आपले भाष्य केले. डॉ. राजश्री पाटील यांनी पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. वसंतराव काळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. मोहन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहसंपादक संजय सुतार यांनी केले तर आभार सुनील इनामदार यांनी मानले. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, उदय मोरे, आनंदहरी, डॉ. वृषभ पाटील, किरण पाटील, विष्णू सुतार, मंगेश कोळी, अदिती जुगळे, सुषमा माने गावडे, शंकर शेलार, आ. क. कुरुंदवाडे, डॉ. चोथे, शक्तीजीत गुरव आदींसह साहित्यिक उपस्थित होते.