संजय घोडावत विद्यापीठाचा तिसऱ्या दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यार्थी आज शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांना नोकऱ्याही त्यांच्या कुशलतेवर मिळतात, काहीजण उद्योजक बनतील पण आपण जे शिक्षण घेतले आहे त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजातील उपेक्षित घटकांना कसा होईल याकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आपण एखाद्याच्या उपयोगी पडतो आहे यासारखा दुसरा आनंद नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून समाजशीलता जपणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पदमश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.मंदाताई आमटे, उपाध्यक्षा सौ. नीता घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, परीक्षा नियंत्रक प्रा.प्रीतम निकम, वित्त व लेखा अधिकारी श्री. पी.ए.देसाई व आदी मान्यवर उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभात विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य केलेले शास्त्रज्ञ, उद्योगपती, प्राध्यापक यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये डीआरडीओ च्या सुप्रसिद्ध वैज्ञानिका डॉ.टेसी थॉमस यांना विद्यापीठाकडून ''डॉक्टर ऑफ सायन्स'' ही मानद पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली. या मानद पदवीचे वाचन डॉ.उत्तम जाधव यांनी केले. याचबरोबर जेसन्स लॅब चे सीईओ संजीव शिंदे, शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.गिरीश, आयआयटीएम चे शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार, स्विनबर्न युनिव्हर्सिटी चे शास्त्रज्ञ डॉ.अमरीश कुलकर्णी यांना ''ऑनररी प्रोफेसर'' ही मानद पदवी प्रदान केली.
डॉ. थॉमस म्हणाल्या '' विद्यार्थ्यांनी जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला हवे. विद्यार्थ्यांकडे ज्ञानासोबत कौशल्य सुद्धा असणे गरजेचे आहे. आज नानाविण तंत्रज्ञान विकसित होत आहे व विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन प्रकल्पाद्वारे समाजउपयोगी संशोधन करावे तसेच नैतिक मूल्ये जोपासून चांगले नागरिक बनणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला व विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती देऊन भविष्यातील योजनांचा उलगडा केला.
अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत म्हणाले '' आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतील पण त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपल्यात असायला हवे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक अभिवृत्ती जपायला हवी तसेच विद्यार्थ्यांनी नेहमीच आई वडील व थोरामोठ्यांचा आदर करायला हवा, अभ्यासाबरोबर आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. येणाऱ्या काळात संजय घोडावत विद्यापीठामार्फत लागेल ती मदत देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. तसेच घोडावत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ''उत्कृष्ट माजी विद्यार्थी'' म्हणून अभिजित संकपाळ याना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ.बी.एम.हिर्डेकर, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, परीक्षा विभागाचे सहाय्यक रजिस्ट्रार प्रा.अरविंद कांबळे व प्रा.अप्पासाहेब पांडव, तसेच सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्नेहल शिंदे व प्रा.जयप्रकाश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या सर्व टीम ने अथक परिश्रम घेतले.