जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
इसाक नदाफ/शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड तालुका शिरोळ येथे गुरुदत्त शुगर च्या पुढाकाराने व उत्कर्ष ॲग्रो रिसर्च अँड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने ॲग्रीबोट या हवाई फवारणी यंत्र (ड्रोन ) द्वारे औषध फवारणी चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गुरुदत्त शुगर चे संचालक बबन चौगुले यांच्या शेतात सदर प्रात्यक्षिक प्रयोग करण्यात आले. ही एक रोबोटिक हरित क्रांतीची सुरुवात असून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यासाठी गुरूदत्त शुगर्सचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे अग्रीबोट ड्रोनचे महाराष्ट्रातील मार्केटिंग हेड राहुल मगदूम यांनी सांगितले.
सदर ड्रोन हवाई फवारणी यंत्र डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल अविएशन (DGCA) व भारत सरकार द्वारे प्रमाणित आहे. या ॲग्री बोट हवाई फवारणी यंत्राची निर्मिती लो टेक वर्ल्ड अविगेशन प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा गुडगाव या कंपनीने केली आहे. या अग्री बोट फवारणी यंत्र द्वारे ७ ते ८ मिनिटात १ एकर क्षेत्राची फवारणी होते. याचा बॅटरी बॅकअप २० मिनिटे आहे. याद्वारे एकाच दिवसात २५ ते ३० एकर फवारणी करता येते. १० लिटर मध्ये १ एकर फवारणी होत असल्याने 80 ते 90 टक्के पाण्याची बचत होते. या ड्रोन हवाई फवारणी यंत्राद्वारे पावडर बेस्ट, लिक्विड, तसेच इतर विद्राव्य खतेही फवारणी करता येतात. सर्वच प्रकारच्या पिकासाठी या यंत्राद्वारे फवारणी करता येते. विशेषता ऊस मोठे झाल्यावर उसावर पडणाऱ्या विविध रोगावर या द्वारे कीटकनाशकांची फवारणी करता येते. तसेच उसाच्या वाढीच्या कालावधीत आवश्यक घटकांचे फवारणी जी मोठ्या उसात करणे अवघड असते तीही या यंत्राद्वारे करता येते. यामुळे उसाचे एकरी 10 ते 15 टन ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच रिमोटद्वारे ५ किलोमीटर वरून सदर ड्रोन ऑपरेट होतो व ज्या जागेवरून उडतो त्याच जागेवर औषध संपले नंतर परत उतरते.
याप्रसंगी गुरुदत्त शुगर चे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, गुरुदत्त शुगर चे मुख्य कृषी अधिकारी विजय जाधव, उप शेती अधिकारी कुलभूषण गाडवे, जालंदर पाटील, बाळासो शिंदे, शब्बीर नाईकवाडे, राजगोंडा पाटील, देवराज पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश चौगुले, भैया चौगुले, प्रकाश सिद्धनाळे, अशोक नेरले, आदीसह ड्रोनचे महाराष्ट्रातील मार्केटिंग हेड राहुल मगदूम, उत्कर्ष ॲग्रो चे सुरज परीट यांच्यासह दत्तवाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर ड्रोन हवाई फवारणी यंत्र द्वारे गुरुदत्त शुगर्स च्य कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांच्या शेतीत प्राथमिक स्वरूपात वापर करून जर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी या यंत्राच्या वापराबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
- राहुल घाटगे
(चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी.)