इसाक नदाक/ शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड सह परिसरात गेल्या अनेक वर्षापासून विद्युत मोटरी तसेच केबल वायर चोरणाऱ्या टोळीने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. दरम्यान आज दत्तवाड तालुका शिरोळ येथील दुधगंगा नदीकाठी केबल चोरणाऱ्या टोळीला दत्तवाड येथील ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यामध्ये एक पुरुष तर चार महिलांचा समावेश असल्याचे समजते.
शहर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून विद्युत मोटर केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शनिवारी दुपारच्या दरम्यान येथील शेतामध्ये सदरची टोळी असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आले होते. दरम्यान या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी या टोळीला ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये ठेवले . यानंतर कुरुंदवाड पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.