जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
उदगाव एमआयडीसी परिसरातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या मध्यप्रदेशातील 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणाची जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा अजित कुशवाह (वय 21) हे मूळचे मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या उदगाव एमआयडीसी येथे हैबतराव निकम यांच्या घरात भाड्याने राहत होते.
त्यांची पत्नी अंजू कृष्णा कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कुशवाह यांना दारूचे व्यसन होते आणि त्यांचा स्वभाव चिडचिडा होता. किरकोळ कारणांवरून आत्महत्येची धमकी देण्याची सवयही त्यांना होती. घटनेच्या दिवशी पत्नीची तब्येत ठीक नसल्याने ती दोन दिवसांनी कामावर येईल, असे तिने सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नी घराबाहेर गेल्यानंतर कृष्णा कुशवाह यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आले असून अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.
