कोल्हापूर | शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १२ तालुक्यांत एकूण **२५४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, १७ धरण क्षेत्रांत १,१४० मि.मी.पाऊस कोसळला आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन शुक्रवारी मध्यरात्री ती १७.४ फूट इतकी झाली. परिणामी राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, शिरोळ, यवलूज आणि कोगे हे सात बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गांवरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.शुक्रवारी सायंकाळी राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर प्रशासनाने तातडीने बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली.नदीकाठच्या भागांवर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या २४ तासांत गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि करवीर तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. राधानगरीसह तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चित्री, जांबरे, सर्फनाला आणि कोदे धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.दरम्यान, चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण ९१ टक्के भरल्याने जलविद्युत केंद्रातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून,गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचल्याने चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविण्यात आली आहे.पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन हवामान विभागाने सोमवारपर्यंत जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' कायम ठेवला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे जवान जिल्ह्यात दाखल झाले असून, बचाव साहित्यांसह विविध पूरग्रस्त भागांची पाहणी आणि जनजागृती मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
