कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पन्हाळगडावरील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात सव्वा लाख चाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी संकल्पाच्या पूर्ततेसाठी 'शिवचाफा महोत्सव' या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत मागील वर्षापासून सावली सोशल सर्कल फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने राज्यभर मोठ्या प्रमाणावर चाफ्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे.
पर्यावरण संवर्धनास चालना देतानाच विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना विधायक सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. वृक्षसंवर्धनासोबतच शिवरायांच्या विचारांचा वारसा आणि निसर्गप्रेमाची भावना समाजात रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या राज्यस्तरीय उपक्रमात राज्यभरातील २७ नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. त्याअंतर्गत सावली सोशल सर्कल फाऊंडेशन, कोल्हापूर, कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे आणि स्पार्कल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवाड परिसरातील नऊ गावांमध्ये तब्बल ५७५ चाफ्याच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. मागील वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची यंदाची सुरुवात १७ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाड, कुमार विद्यामंदिर क्रमांक ३, साने गुरुजी शिक्षण संस्था आणि एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या प्रसंगी सुहास चिंचवाडे, सीए सुनील मुळे, कुरुंदवाड अर्बन बँकेचे संचालक मोनाप्पा चौगुले, शांतिनाथ आलासे, रमेश अण्णा भुजुगडे, रविकुमार पाटील, प्राचार्य सुनील चव्हाण, प्रा. संजय पाटील, कुरुंदवाड परिसर मित्र मंडळाचे संचालक प्रा. दशरथ सूर्यवंशी, मंडळाचे निमंत्रित संचालक उत्कर्ष निकम, पत्रकार संदीप अडसूळ तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे नियोजन प्रशांत पाटील यांनी केले असून, मंडळाचे अध्यक्ष बाबुराव जोंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर येथून चाफ्याची रोपे आणण्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची मदत स्वातंत्र्यसैनिक कै. श्रीपाल आलासे (काका) स्मृतीप्रित्यर्थ कुरुंदवाड अर्बन बँक को-ऑप. बँक लि., कुरुंदवाड यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व देणगीदार, हितचिंतक, स्वयंसेवक, सहभागी संस्था आणि मंडळाच्या सर्व सदस्यांचे कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
