Top News

उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलता ; आमदार यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांनी घेतली जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट




जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

पाऊस लांबणीवर पडल्याने शिरोळ तालुक्यातील ऊस, भाजीपाला व इतर पिकांवर संकटाचे ढग दाटून आले असताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उपसा बंदीच्या आदेशात आणखी तीन दिवसांची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता २६ जूनपर्यंत उपसा सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरोळ तालुका हा कृषीप्रधान आणि बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यात ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र यंदा मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची अनिश्चितता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उपसा बंदी लागू केली होती. या निर्णयामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळणे कठीण झाले होते आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते.

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन यापूर्वी तीन दिवसांसाठी उपसा बंदी शिथिल करण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पुरेसे पाणी मिळू शकले नव्हते. परिणामी अनेक ठिकाणी पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि शिरोळ तालुक्यातील वास्तव परिस्थिती सविस्तरपणे मांडली.

या भेटीनंतर मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत उपसा बंदीच्या आदेशात आणखी तीन दिवसांची शिथिलता देण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यामुळे २६ जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसात पावसाचे अवलोकण करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे धोक्यात आलेल्या हजारो एकर पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

थोडे नवीन जरा जुने