Top News

मानवतेचा स्पर्श; वरिष्ठ नागरिक संघाकडून जानकी वृद्धाश्रमला भरघोस मदत


बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :

"मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या उदात्त भावनेतून कार्य करणाऱ्या इचलकरंजी येथील वरिष्ठ नागरिक संघ, नर नारायण सेवा संस्था आणि मानव सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमाला विविध जीवनावश्यक साहित्याची भरघोस मदत करण्यात आली. यावेळी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची आत्मीयतेने विचारपूस करत भविष्यातही अशीच मदत सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.

सध्या जानकी वृद्धाश्रमात ३५ हून अधिक वृद्ध वास्तव्यास असून त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विविध संस्थांच्या वतीने ब्रिज, प्रेशर कुकर, मिक्सर, जेवणासाठी ताट, वाट्या, ग्लास तसेच स्वयंपाकासाठी लागणारी विविध भांडी भेट देण्यात आली. या मदतीमुळे वृद्धाश्रमाच्या दैनंदिन व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार आहे.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वृद्ध आजी-आजोबांसमवेत वेळ घालवत त्यांच्यासोबत मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतला. वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांनाही भावनिक समाधान लाभले.

भविष्यात जानकी वृद्धाश्रमाला अधिक मोलाची मदत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच हॉलमध्ये पंख्यांची व्यवस्था करून देण्याची ग्वाही ओमजी पोद्दाररामगोपालजी माहेश्वरी यांनी दिली. तर शिवजी तोष्णीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वृद्धांच्या बसण्यासाठी खुर्च्या व अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

यावेळी बुधराजजी सोनी, अशोकजी जाजू, रामस्वरूपजी पारेख, अरुणजी राजदंड, रेवजी जैन, नवरत्नलालजी लड्डा, पारसजी जैन, नरेंद्रजी लाहोटी यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी वृद्धाश्रमात सुरू असलेल्या मानवकल्याणाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचे स्वागत जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब पुजारी व त्यांच्या मातोश्री सुशीला पुजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब कदम (सदलगा) यांनी केले.

समाजातील दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचे आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने